गुरुवार, २३ एप्रिल, २००९

...तोच आहे.

बासरीत सूर ओतले ज्याने,
नंदनवन गोकुळी फुलवीले ज्याने,
तुजवरी छाया कृपेची धरणारा मुरारी
श्री कृष्ण "सखा" तोच आहे !

कालियाचे मर्दन केले ज्याने,
कन्साचे ताड्न केले ज्याने,
तुज वादळात सावरणारा गिरिधारी
श्री कृष्ण "सखा" तोच आहे !

तुलसिदलात स्वत:ला तोलले ज्याने,
द्रौपदिचे लज्जारक्षण केले ज्याने ,
तुज दु:खाच्या भवसागरातुन तारणारा हरी
श्री कृष्ण "सखा" तोच आहे !

कौरावांविरुद्ध पान्चजन्य फुन्कला ज्याने,
अर्जुनास गीता सांगितली ज्याने,
तुज आत्मबळ देणारा सुदर्शनधारी
श्री कृष्ण "सखा" तोच आहे !

म्हणून म्हणतो ऐका माझे...

प्रियकराची हजार लफडी
प्रेयसीचे हजार नखरे
म्हणून म्हणतो ऐका माझे
या वाटेवर न गेलेलेच बरे.

तो म्हणतो मी चुकलोच नाही
ती म्हणते फक्त माझेच खरे.
प्रेमाचे दिवस संपले की
वाहतात संशयाचे वारे..!!
म्हणून म्हणतो ऐका माझे
या वाटेवर न गेलेलेच बरे...

त्याला भेटायाची वेळ
ती मुद्दाम विसरते.
त्याला काही केल्या
तिचा जन्मदिन न स्मरे..!!
म्हणून म्हणतो ऐका माझे
या वाटेवर न गेलेलेच बरे...

लग्न झाले की ओढ सरते,
सुकतात सारे प्रेमाचे झरे.
महिन्याचा खर्च भागवताना
डोळ्यांसमोर दिसतात तारे..!!
म्हणून म्हणतो ऐका माझे
या वाटेवर न गेलेलेच बरे...

ओफिसमध्ये साहेबाची कटकट,
घरात बायको आणि पोरे.
पाहुणे येऊन त्रास देती
तशात ही महागाईमारे..!!
म्हणून म्हणतो ऐका माझे
या वाटेवर न गेलेलेच बरे...

एकटेपणा जरी वाटला बरा,
संध्या छाया भिववतीमना.
ते सूरकुतलेले मावळतीचे दिवस
सांगा घालवावे कोणाच्या आधारे?
तरीही म्हणतो ऐका माझे
या वाटेवर...

आम्हा गरीबांचे बघा...

आम्हा गरीबांचे बघा
सारे पत्त्यांचे बंगले.
वेदनेच्या पायावर
सा-या सुखांचे ईमले.

शीळ्या भाकरीचा घास,
तेही तुकडे जळके.
चार कुडाच्या या भिंती,
वर छप्पर गळके.

काजळल्या कन्दिलाचा
प्रकाशही काजळला.
सुख - सौख्याचा आस्वाद
आम्हा कधी ना कळला.

असे जग हे स्वप्नांचे
सारा स्वप्नांचाच खेळ.
आसु आणि हासूमध्ये
कधी नसतोय मेळ.

आम्हासाठी जीवन हे
अळवावरचे पाणी.
जगजेठी ना साहते,
सखी वाटते विराणी...

...मी आहे.

मी आहे...

तू घेतलेला प्रत्येक श्वास
तू सोडलेल्या प्रत्येक
प्र:श्वासाला सांगेल ... मी आहे.
तुझ्या जीवनात आलेले
मोजके सुखाचे क्षण, तुझ्या
प्रत्येक दु:खद क्षणाला
सांगतील ...मी आहे.
मधुबनातून मरुभुमीकडे
वाहणारा वारा, तुझ्या
थकलेल्या मनाला सांगेल ...मी आहे.
तृशार्त वाटसरूंची तृषा शांत करुन
सागराकडे धाव घेणारी सरीता
तुला सांगेल ...मी आहे.
काट्यांवर चालून घायाळ
झालेल्या तुझ्या नाजूक पायांना
काटेरी सिंहासनावर पहुड्लेले
गुलाब तुला सांगेल ...मी आहे.

ज्ञानियांच्या मेळ्यामध्ये...

ज्ञानियांच्या मेळ्यामध्ये
मी हो अज्ञानी भाबडा.
तुम्हा रुचेल कसा हो
माझा भाव हा रांगडा.

तुम्ही शाल मखमली,
मी हो फाटके घोंगडे.
का हो ज्ञान मेळ्यात या
मला करता नागडे.

जन्म अंधारात गेला,
माझे सूर्याशी वाकडे.
जरा समजून घ्यावे
हेची तुम्हासी साकडे.

जरा सरावुद्या हात,
नीट वळू द्यावे शब्द.
मग करेन जीवन
तुम्हासाठी ओवीबद्ध.

स्पर्श तुझ्या शब्दांचा...

वेदनेस शमवितो,
दु:खातही सुखवितो.
संजीवनी जणूकाही -
स्पर्श तुझ्या शब्दांचा.

मरुभुमीत सन्कटान्च्या
वसंत होऊनी फुलतो.
गुलमोहराचे अस्तित्व -
स्पर्श तुझ्या शब्दांचा.

विकल मना सावरतो
अंधारात दिप धरतो.
भास्करच नभीचा भासे -
स्पर्श तुझ्या शब्दांचा.

वादळात आधार होतो
तप्त ऊन्हे साहतो.
कल्पवृक्ष असे मजसाठी -
स्पर्श तुझ्या शब्दांचा.

आत्म्याचे अमरत्व आहे
ईश्वराचे पावित्र्य आहे.
अम्रुततुल्य आहे आई -
स्पर्श तुझ्या शब्दांचा.

हा पहाटवारा...

तुझ्या नाजूक बाहुंची मिठी
अन् प्रेमाचा उबारा,
मोहवून जातो
मज हा पहाटवारा.

केसांमधे लहरतो,
श्वासामधे बहरतो,
बाहूत या मोहरतो
हा पहाटवारा.

अनमोल आहे,
मुक्त, अनंत आहे,
आहे सृष्टीची अमृतधारा
हा पहाटवारा.

कधी सावली प्रेमाची,
कधी उब वात्सल्याची,
कधी गोड्सा शहारा...
हा पहाटवारा.

कधी सखे तुझा हा
सुगंध घेऊन येतो.
श्वासात भरून राहतो
हा पहाटवारा.

इथले प्रत्येक क्षण...

इथले प्रत्येक क्षण मानवी संवेदनांना
हादरा देणारे असतात...
आणि तरीही सर्वजण
नेहमी मरुन जगत असतात.

दंगली होतात, बॉम्बस्फोट होतात.
भेसळयुक्त सिमेंटच्या इमारतीखाली
आणि कधी पावसाच्या मा-याखाली
माणसे शेकड्याने मरतात.

जखमी, मृतांच्या नावाने
अनुदान जाहीर केली जातात.
मदतीच्या नावाखाली
स्वत: चीच खळगी भरतात.

लोकही थोड हळहळतात
सरकारच्या नावाने बोटे मोडतात.
नंतर पुन्हा नेहमीप्रमाणे
आपल्या कामाला लागतात.

स्वप्न ऊध्वस्त होताना बघतात.
जीव मुठीत धरून जगतात.
हे आता नित्याचच झाल आहे
असेच सारे म्हणतात...
इथले प्रत्येक क्षण...

देव नाही दिसला मला

देव नाही दिसला मला
देवाच्या देव्हा-यात.
नाही सापडला तो
देवळाच्या गाभा-यात.

दिसला तो भाव भोळा
पाथरवटाच्या घणात.
खेळताना पाहिले मी त्याला
कुंभाराच्या मातीत.

कधी दिसला तो मला
शेतक-याच्या नांगरात,
तर कधी गुंतलेला पाहिला
विणक-याच्या मागात.

कधी शिल्पकराच्या
शिळेतुन साकार झाला,
कधी चित्रकाराने त्याला
कागदावरी चितारला.

शोधूनी श्रम क्लांत होऊनी
विसावलो असता क्षणभर
हृदयातून आली साद
असता मी "सोहम"
का शोधीसी मला जगभर?

तूच हो अवनी...

समर्थ पंखांनी
घे भरारी.
कर मुक्त विहार
या नभांगणी.

दुबळ्या भावनांच्या
तोड तू श्रुन्खला.
तव नेत्र तेज पसरू दे
या तारांगणी.

स्पर्शात तुझ्या
उतरू दे संजीवनी.
अधरान्तुन स्त्रवु दे
अमृतवाणी.

दुबळ्या गगनाला
क्षितिजावर सावरणारी
जीवनदान देणारी
तूच हो अवनी, तूच हो अवनी, तूच हो अवनी...

मला...

मध्यान्हिच्या या तप्त ऊन्हात
आज मला चालायचे आहे.
कोणास ठाउक ऊद्या नशिबी
पहाटेचे ऊन आहे की नाही?

द्वेषाच्या विषारी काट्यांवर आज
अनवानी प्रवास करायचा आहे.
कोणास ठाउक ऊद्या नशिबी
पाकळी फुलाची आहे की नाही?

दु:खाच्या या वडवानलात
आज मनसोक्त भिजायचे आहे.
कोणास ठाउक ऊद्या नशिबी
शीतल प्रेमधारा आहे की नाही?

अपमानाचे हलाहल आज
आकन्ठ प्राशन करायचे आहे.
कोणास ठाउक ऊद्या नशिबी
संजीवक अम्रुतधारा आहे की नाही?

स्वार्थाने दुषित झालेली ही हवा
ऊरात भरुन घ्यायची आहे.
कोणास ठाउक ऊद्या नशिबी
निर्मल वारा आहे की नाही?

वाट्यास येणारा प्रत्येक कटू क्षण
मला हसत जगायचा आहे.
कोणास ठाउक ऊद्या नशिबी
जीवन जगणे आहे की नाही?

मृगजळ...

सुंदर जीवनाची कल्पना
माझ्यासाठी मृगजलासारखी आहे.
तिच्यामागे धावण्यातच आयुष्य निघून गेले,
एक स्वप्न जे अनुभवता नाही आले.
अगदी उर फाटेपर्यंत धावलो,
पण कधी हाती नाही आले.
हृदयाची धडधड मंदावली,
श्वासही रुंदावला आहे.
पायांनी साथ सोडली, पण
डोळे अजूनही त्या मृगजलाचा
पाठलाग करत आहेत.
मन अजूनही त्या स्वप्नामागे धावतय.
व्यवहारी मेंदू अव्यवहारी मनाला समजावतोय
"अरे वेड्या डोळे उघड, सत्याला समोरा जा."
पण मन काही ऐकत नाही.
कारण त्यालाही माहिती आहे...
हे मृगजलच त्याच्या जगण्याचा आधार आहे,
डोळे उघडले की स्वप्न संपेल,
जगण्याची उमेद संपेल,
स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेली धाव संपेल.
म्हणून मी पुन्हा धावतोय,
व्यवहारी जगाचे न ऐकता,
मृगजळ हाती येईपर्यंत, किंवा...
हृदयाची धडधड थांबेपर्यंत...

भुमीपुत्रच भूमीहीन झालाय

भुमीपुत्रच भूमीहीन झालाय,
दाही दिशांना वणवण फिरतोय.
लोकांचे पोट भरणाराच आज
उपासमारीने मरतोय.

शेतक-याचा पोर उपाशी
शेतक-याच्या देशामध्ये.
कुपोषणाच्या वेषात
बालमृत्यू थैमान घालतोय.

बँकांकडून कर्ज घेतले
दुष्काळाने लादली नादारी.
घाव हा दुहेरी प्रवृत्त
आत्महत्येला करतोय.

सरकारी अनुदाने होत आहेत
मंत्र्यांच्या तिजोरीत बंद.
कर्जवसुलीसाठी शेतक-यांच्या
घरादारावर नांगर फिरतोय.

श्रीमंतांच्या, हिरोन्च्या भल्यासाठी
नवस सायास केले जातात.
गरीब शेतक-याला आपण
पद्धतशीर विसरतोय.

तू आहेस.

सुगंधाने चिंब केले
माझे मन जिने
तो पारीजाताचा
दरवळ तू आहेस.
दृष्टिहीन डोळ्यांना
सुख स्वप्न दिले जिने
ती रातराणी
तू आहेस.
निवडुंगाच्या काटयांना
मुलायम फुलांचा साज दिला जिने
ती फुलराणी
तू आहेस.
निश्प्राण कलेवरात
प्राण ओतले जिने
ती अमृतवाणी
तू आहेस.

मी अगदी वा-यासारखा आहे.

मी अगदी वा-यासारखा आहे.
सदैव तुझ्या अवती भोवती असेन
शोधू नकोस बाहेर मला कुठे,
डोळे बंद करून बघ मी तुला तुझ्यातच दिसेन.

ती अशी ओलेती

ती अशी ओलेती
पावसाने चिंब भिजली,
सा-या सृष्टीची नजर
तिच्या काये वर थिजली.

घन केश संभार पाहण्या
मेघांनी केली दाटी.
विद्युल्लताही तिच्या
पदन्यासाने लाजली.

ती भासे कधी शीतल
सरिता भूतलीची.
कधी भासे गगनातली
चमचमती बिजली.

ती अशी ओलेती...

खरच सांगतो तुम्हाला

खरच सांगतो तुम्हाला
आमच काहीच नाही गेल
पण कविता वाचताना
बरच काही झाल.

कवीचे शब्द सामर्थ्य म्हणू
की माझ्या कल्पनांची झेप?
पण त्या कवितेने मला
एका वेगळ्याच जगात नेल.

तिथे तू होतीस आणि मी होतो
बाकी नव्हते दुसरे कोणी.
मी होतो वट वृक्ष
तू झालिस नाजूक वेल.

हात तुझ्या भोवती गुंफलेले
ओठ ओठान्त गुंतलेले.
तुटले बंध सारे
तन प्रेमात चिंब न्हाल.

ही कल्पना खरी झाली तर
आयुष्याला बहर येईल.
नुसत्या विचारानेच सारे
मन मोहरून गेल...

उघड बार देवा आता

आता तळीरामाला
मार्ग कोणी दावा...
उघड बार देवा आता
उघड बार देवा.


पिते दारू डोळे मिटुनी
जात बेवड्याची,
मनी त्याच्या भीती का हो
नशा चढण्याची?
सरावल्या पायांनाही
कंप का सुटावा?
उघड बार देवा आता
उघड बार देवा.


रोज रात्री करतो देशी
बारची हा वारी.
घरी मात्र जाताना का
शोधी दिशा चारी?
बेहोश होई रोज करूनी
मदिरेची सेवा.
उघड बार देवा आता
उघड बार देवा.


रस्त्यावरूनी चालताना
मोजतो हा पावले.
झिंग चढल्यावाचून घरी
जाणे नाही भावले.
शेजा-याच्या दारातही अपुला
दरवाजा दिसावा.
उघड बार देवा आता
उघड बार देवा.

तुझ्या रुपातुनी दर्शन घडते

तुझ्या रुपातुनी दर्शन घडते
निर्मात्याच्या कलाकृतीचे.
दिपविणारे तेज पसरले,
जगी तुझ्या या मुखकमलाचे.

जुलफांच्या ह्या छायेखाली,
सुवर्णरूपी बहार आली.
अंधारमयी अवकाशात या,
पहा ही गोड चांदणी उगवली.

धनुष्यकारी भ्रकुटिखाली
नयन कमळ ते दोन लाजरे.
भासती जसे ते दोन तारे
विशाल गगनी लुकलुकणारे.

आरक्त अधर अन् कपोल तुझे
तृशार्त मनाला सुखविणारे.
दन्तपंक्ती जणू भासती,
हंस नभी ते विहरणारे.

नजरेला नजर हवी

नजरेला नजर हवी,
एक हवा कर करात.
हलती प्रतिमा पाहावी
विरणा-या वलयात.

गालावरची लज्जा,
खुलणारी मिलनात.
दृढता नि:संग हवी,
दोघांच्या कम्पनात.

श्वासातून प्रीतीचे
अन् हवे आश्वासन.
ढळणा-या त्या क्षणांत
अक्षयतेचे सर्जन.

माझे जीवन...

माझे जीवन अळवा वरच्या
पाण्यासारखे आहे.
कधीच न गायलेल्या
गाण्यासारखे आहे.

माझे जीवन एका
अवलीयासारखे आहे.
सर्व जाणूनही अजान अशा
शहाण्यासारखे आहे.

माझे जीवन काट्यांवर वसलेल्या
फुलासारखे आहे.
प्रिय सखीने केलेल्या
लाडीक बहाण्यासारख्या आहे.

माझे जीवन आकाशातील
इंद्रधनूसारखे आहे.
प्राणसखी अवनीच्या
तराण्यासारखे आहे.

सजनासाठी

एक अलबेली नार
केला सोळा शिनगार.
नववधूचा साज ती ल्यालि
आज काय असे खास?
असे विचारता बोले
"माझ्या सजनासाठी मी सजली"

काळे भोर तिचे डोळे
मुखमंडल ते भोळे.
नाजूक ती ओठांमधे हसली.
आज काय असे खास?
असे विचारता बोले
"माझ्या सजनासाठी मी सजली"

मेघमयी तिचे केस
झाले मर्यादेची वेस.
काया चांदण्यात पहा तिची न्हाली.
आज काय असे खास?
असे विचारता बोले
"माझ्या सजनासाठी मी सजली"

ल्यालि आकाशाची शाल
सूर्य चुंबी तिचे भाळ.
श्रावणातल्या धरेसारखी सजली.
आज काय असे खास?
असे विचारता बोले
"माझ्या सजनासाठी मी सजली"

मी असाच तुझ्या जिवनामध्ये

मी असाच तुझ्या जिवनामध्ये
अधून मधून येत राहीन,
दु:खाच्या बोचरया उन्हात तुला
शीतल छाया देत राहीन.

कधी तहाणल्यास मन तुझे
प्रेम सुधा होऊन बरसेन.
अश्रू तुझ्या नयनातील टिपण्या
या प्राणांचेही मोल देईन.

असो माझे स्थान
तुझ्या मनात कुठेही,
तू मात्र माझ्यासाठी जशी आहेस...
मी तुला तशीच पाहीन.

मी असाच तुझ्या जिवनामध्ये
अधून मधून येत राहीन...

कधी...

कधी लटकेच रुसणारी,
कधी माझ्या ओठांनी हसणारी.
अशी आहे अवनी माझी
चंद्रकलेगत खुलणारी.

कधी कळीसारखी फूलणारी
कधी वसन्तासम बहरणारी.
संजीवक प्राणदायी अवनी
आहे अमृत स्त्रवणारी.

कधी लक्ष्मी, कधी सरस्वती.
कधी महिषाचे मर्दन करणारी.
शक्तिदेवि होऊनी हे
आकाश तोलुन धरणारी.

देवादिकांना झुकविणारी
दु:खी मनुजाला सुखवीणारी.
सांग सखे तू आहेस कोण
थांबुनी जवळ माझ्या क्षणभरी...

गुलमोहर.!

माझ्या अंतर्बाह्यात
सामावलीस तू.
दूरवर पसरलेल्या मार्गात माझ्या
उभी होतीस तू.
अन् मी पुढेच जात राहिलो,
गुंग होऊन माझ्या विचारांत.
जीवनही गुरफटून गेले
त्या अनुत्तरित प्रश्नांत.
तुला भेटण्यास
दोन शब्द बोलण्यास
वेळच कुठे होता? आता...
आता तर पर्जन्यधारांसमवेत
बरसतेस तू.
आणि शेवटी वेळ
असताना मजपाशी
घाईत आहेस तू.
काय सांगू, काय सांगू आपण...
अजाणताच म्हणतो -
आहे बेमौसम हे शहर.
पुन्हा कधीतरी भेटूया...
अलविदा - ए - गुलमोहर.!

चारोळ्या...

ओठ डाळीम्बाचे तुझे,
गाल गुलाबी केसरी.
मेघमयी केस आणि
मधुघट तुझ्या उरी.!

प्रिया माझी ही कोमल
सोन चाफ्याच्या अंगाची.
श्वास चंदन चंदन,
काया केतकी रंगाची.

अशी तू मुक्त
मन मंदिरात विहरणारी.
श्वासात उष्म लहरणारी,
बाहूत माझ्या बहरणारी.

दुसर्‍यांना टाळण्यासाठी

माणसे दुसर्‍यांना टाळण्यासाठी
काय काय करतात?
लोक घरी येऊ नयेत
स्वत:चे घर सामानानाने भरतात.

काहीजण तर कमालच करतात
घेणेकरांना टाळण्यासाठी
टेम्पररिली मरतात.

लॉग इन असूनही ओफलाइन राहतात
ज्यांना खरच त्यांची गरज आहे
अशा मित्रांची गोची झालेली पाहतात.

संगणकामुळे जग जवळ आले
असा काही लोकांचा समज आहे.
पण टाळण्याच्या सवईमुळे
जवळ असलेलेही दूर होत जातात.

म्हणणे तुम्ही ऐका माझे
ज्यांना टालायचे त्यांना
त्यांना समाविष्ट करू नका.
ज्यांना अर्ध्या वाटेवर सोडून जायचे आहे
त्यांचा हात कधी धरू नका

हृदयाची स्वामिनी तू...

कधी रमणी,
कधी कामिनी तू.
कधी कृष्णमेघांतील
चमचमती दामिनी तू.
परिकथेतील परी कधी तू,
तर कधी भामिनी तू.
मनमंदिरात विराजमान या
हृदयाची स्वामिनी तू...

सासरेबुवा सासरेबुवा

सासरेबुवा सासरेबुवा
काय तुमची कथा,
अहो काय तुमची कथा?
तुमची होते गंमत
मात्र आमची होते व्यथा.
अहो काय तुमची कथा.

सासरेबुवा सासरेबुवा
काय तुमची शिस्त,
अहो काय तुमची शिस्त?
एकावेळी नाश्त्याला
दोन कोंबड्या फस्त.
अहो काय तुमची शिस्त?

सासरेबुवा सासरेबुवा
काय तुमची करणी,
अहो काय तुमची करणी?
तुमच्या आकारापुडे
फिकी पडते बरणी.
अहो काय तुमची करणी?

सासरेबुवा सासरेबुवा
काय तुमची पोट,
अहो काय तुमची पोट?
एकावेळी लागतात तुम्हाला
चार जणांचे कोट.
अहो काय तुमचे पोट?

सासरेबुवा सासरेबुवा
काय तुमच्या मिशा,
अहो काय तुमच्या मिशा?
आता कळले सासुबाई
घाबरतात कशा.
अहो काय तुमच्या मिशा?

सासरेबुवा सासरेबुवा
काय तुमचा राग,
अहो काय तुमचा राग?
भुक लागली म्हणुन तुम्ही
भाजुन खाल्ला वाघ.
अहो काय तुमचा राग?

सासरेबुवा सासरेबुवा
काय तुमचा रुबाब,
अहो काय तुमचा रुबाब?
आमच्या सुखी संसारात
तुम्ही हड्डी आम्ही कबाब..
तुम्ही हड्डी आम्ही कबाब...

यातिल काही ओळी मी एका नाटकामध्ये ऐकल्या होत्या, त्यांमध्ये आणखी काही ओळी जोडुन हे विडंबन केले आहे.

आलो शरण तुला ईश्वरा...

कितीक प्रमाद घडले माझे
मार्ग दाखवी खरा.
आलो शरण तुला ईश्वरा...

तुझी कृपा नर जन्मी घातले,
सुख दु:खाचे दिवस दाविले.
क्रुतघ्न मी पण तुला विस्मरे,
क्षमा करी लेकरा.
आलो शरण तुला ईश्वरा...

संसाराचे पाश तोडता,
इथे मोहवी विकारवशता.
मन गुंतावे चरणी तुझीया,
लोभ सरावा पुरा.
आलो शरण तुला ईश्वरा...

उदासीनता मनास व्यापी,
रुदन येतसे पश्चातापी.
भवपन्थातुनी मला सोडवी,
करूनी अवघी त्वरा.
आलो शरण तुला ईश्वरा...

कधी सुख, कधी दु:ख

कधी सुख, कधी दु:ख
नियतीचा खेळ जुना.
तुझ्या प्रेमाची सावली
जणु प्राजक्त अंगणा.

तूच माझी प्राणसखी,
तूच पवित्र चेतना.
तुझ्याविना अर्थ कसा
सांग येईल जीवना?

कधी रमणी बनशी
होउनिया तू ललना.
कधी होउनिया माता
लाजविशी तू चंदना.

तूच देणे हे देवाचे,
तूच ईश्वरी प्रार्थना.
शब्द अपुरे पड़ती
प्रिये तुझीया वर्णना.

एक कविता माझी

 एक कविता माझी: माझिया मनात तिचीच सय भेटते परी बोलणे नाही भासे जरी ती अवखळ झरा वाहणे तिचे उथळ नाही नयनी जरी दिसती भाव खट्याळ हृदयात कारुण्य ...