सांजवातीसारख
दिवाभितीसारख
स्वत:च
शरीर अन मन जाळायच असत.
मन
चुरगळलेल असल तरी
शरीर
कोर करकरीत ठेवायचं पथ्य मात्र पाळायच असत.
सगळेच
प्रेमी असतात,
सगळेच
प्रेम असल्याचा दावा करतात.
पण
प्रेमाच्या गोंडस नावाखाली
त्यांना
फक्त शरीर हाताळायच असत.
म्हणूनच
मन चुरगळलेल असल तरी
शरीर
कोर करकरीत ठेवायचं पथ्य मात्र पाळायच असत.
त्याच
अंधारलेल्या कोंदट खोल्या,
तेच
किळसवाणे स्पर्श आणि
त्याच
घुसमटलेल्या आर्त किंकाळ्या.
मेलेल्या
डोळ्यांनी सुर्योदयाचे स्वप्न पहात
सुर्यास्तासारखच
ढळायच असत.
म्हणूनच
मन चुरगळलेल असल तरी
शरीर
कोर करकरीत ठेवायचं पथ्य मात्र पाळायच असत.
कधी
जन्मदातेच वैरी बनतात,
कधी
जीवनाचे सोबती दलाली करतात.
नाती
जोडण्याचा विचार न करता
वेदना
व्यक्त करण टाळायच असत.
म्हणूनच
मन चुरगळलेल असल तरी
शरीर
कोर करकरीत ठेवायचं पथ्य मात्र पाळायच असत.
आमच्या
मुलाचं भविष्य धुसर असत,
तर मुली
धंद्यासाठी पूरक असतात.
शंभरात
एक या नरकातून वाचली तरी
बाकीच्यांना
याच नरकामध्ये फुलायचं (?) असत.
म्हणूनच
मन चुरगळलेल असल तरी
शरीर
कोर करकरीत ठेवायचं पथ्य मात्र पाळायच
असत.